EDITORIAL

Published by
Archive Manager

दिएन-बिएन फू ची लढाई

इतिहास परिवर्तक ठरलेली आणखी एक लढाई म्हणजे युरोपीय वसाहतवादाचा कर्दनकाळ ठरलेली व्हिएतनाममधील 'दिएन-बिएन फू'मधील फ्रेंचाची साठमारी.

पार्श्वभूमी : व्हिएतनाम हे आग्नेय आशियातील इंडो चायना द्विपकल्पातील एक राष्ट्र (नकाशा पहा) त्याच्या उततरेला चीन, वायव्येला लाओस, नैऋत्येला कंबोडिया आणि पूर्वेला दक्षिण चीन समुद्र आहे. उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम यांचे एकीकरण होऊन १९७६ मध्ये व्हिएतनाम स्वतंत्र झाला. किंबहुना चीन, रशिया, क्युबा या एकाधिकारी साम्यवादी तत्त्वांवर आधारित असलेल्या देशांपैकी व्हिएतनाम हा देश आहे. नऊ कोटी वस्तीच्या या राष्ट्रात १९८० नंतर लक्षणीय आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक सुधारणा घडून आली आहे. परंतु त्यासाठी १९४० नंतर जपानी साम्राज्यवादाशी संघर्ष, १९४६ ते ५४ मध्ये फ्रेंच सैन्याशी पहिले इंडो चायना युद्ध, १९६६ ते १९७५ दरम्यान अमेरिकी सैन्याबरोबर दुसरे इंडो चायना युद्ध आणि १९७९ मध्ये चीनशी अल्पावधी चकमक अशा चार बलाढ्य शक्तींबरोबर या छोट्या नवोदीत राष्ट्राला सामना द्यावा लागला. त्या चारही परकीयांवर मात करणारे दुर्दम्य राष्ट्र आहे.

व्यापाºयांच्या वेशात चंचुप्रवेश केलेल्या फ्रेंचांनी १८८७ मध्ये व्हिएतनाममध्ये आपली वसाहत स्थापन केली. १९४१ साली व्हिएतनाममध्ये आक्रमण करून जपानी सैन्याने फ्रेंचांचा पराभव केला. त्यापश्चात जपान्यांनी नैसर्गिक संसाधनांची केलेली लयलूट १९४५ च्या व्हिएतनाममधील भयानक दुष्काळाला कारणीभूत ठरली. १९४५ मध्ये जपान्यांचा परभाव झाल्यानंतर फ्रेंचांनी आपला मालकी हक्क पुनश्च मिळवला. त्यांच्या वसाहतवादाविरुद्ध १९४५ मध्ये हो ची मिन्ह या साम्यवादी नेत्याने स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतिवादी चळवळ सुरू केली. व्हिएटमिन्ह ही बंडखोर सेना त्यांनी चीन आणि रशियाच्या साह्याने उभी केली. व्हिएटमिन्हने उत्तरेती हनोईचा परिसर व्यापून २ सप्टेंबर १९४५ला राष्ट्रीय सरकारची स्थापना केली आणि व्हिएतनामच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

या आव्हानाला तोंड देण्यासाठी फ्रेंच सरकारने 'फ्रेंच फार इस्ट एक्सपिडिशनरी कोअर' नावाच्या एका जंगी सैन्य तुकडीचे गठण केले. त्यात फ्रेंच सैन्याबरोबरच अल्जेरि़या, मोरोक्को वगैरे फ्रेंच वसाहतींमधील सैनिक आणि दक्षिण व्हिएतनाममधील फ्रेंचांशी स्वामीनिष्ठ असलेल्या 'ताय' जमातीमधील सैनिक समाविष्ट होते. १९४६ ते १९५४ या आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळात व्हिएटमिन्ह आणि फ्रेंच सैन्यात कडा संघर्ष होत राहीला.

चीन आणि रशियाच्या सढळ मदतीच्या साह्याने आणि प्रखर परिश्रम व प्रशिक्षणापश्चात व्हिएटमिन्ह सैन्य केवळ बंडखोरांचे तकलुपी सैन्य न राहता एका सशस्त्र सैनिक दलामध्ये (रेग्युलर आर्मी) त्याचे रुपांतर झाले. भूपृष्ठाचे उत्तम ज्ञान, देशवासीयांची सहानुभूत व सक्रिय मदत आणि देशभक्तीने प्रेरित झोल्या व्हिएटमिन्हने  युरोपीय देश आणि अमेरिकेकडून साह्य लाभलेल्या आधुनिक फ्रेंच सैन्याशी तब्बल साठ वर्षे सातत्याने लढा दिला. व्हिएटमिन्हचा मुख्य युद्धविजयी घटक म्हणजे त्याचे नेतृत्व. आठ वर्षे सतत आपल्या मातृभूमी संरक्षणासाठी लढणारे आणि अगदी कनिष्ठ पदावरून वर चढत आलेल्या व्हिएटमिन्ह अधिकारीवर्गाचे प्रमुख जनरल व्हो न्युयेन गिआप. जय-पराजयाच्या प्रदीर्घ लपंडावानंतर फ्रेंच सैन्याने व्हिएटमिन्हचा सोक्ष लावून तडजोडीस त्यांना भाग पाडायचे ठरवले. या निकाली सामन्यासाठी त्यांनी निवड केली ती उत्तरेतील दिएन-बिएन फू या रणक्षेत्राची. पण ती घोडचूक ठरली. दिएन बिएन फूचा प्रदेश द्रोणाच्या आकाराचा होता. त्यात फ्रेंचांची मोर्चेबंदी होत असलेली पाहत एक सुवर्णसंधी स्वत:हून आपणहून चालून आल्याचे जनरल गिआंपनी धूर्तपणे हेरले. त्यांनी या वाटीच्या आकाराच्या प्रदेशाच्या कडांचा ताबा घेतला. १३ मार्च ते ७ मे १९५४ या कालावधीत दोन महिने चाललेल्या लढाईत फ्रेंच सैन्याचा निर्णायक पराभव झाला आणि त्यातून वाचलेल्या प्रत्येक फ्रेंच सैनिकांवर युद्धकैदी ोण्याची नामुष्की आली. या लढाईतील पराभवानंतर फ्रेंचांना आपला गाशा गुंडाळून स्वदेशी परतावे लागले. मार्टिन विंझे या प्रसिद्ध इतिहासकारानुसार, वसाहतवाद विरोधी चळवळ करणाºया बंडखोर तरुणांमधून सुसज्ज आणि शस्त्रसंपन्न पारंपरिक सेनेत रुपांतरित झालेल्या आशियाई सेनेने आपला देश बळकावणाºया आधुनिक पाश्चात्य सैन्याचा एकाच लढाईत केलेल्या निर्णायक पराभवाचे दिएन-बिएन फू हे पहिले आणि अद्वितीय उदाहरण आहे.

व्यूहरचना : १९५३ साल उजाडले तेव्हा व्हिएतनाममधील गेली सात वर्षे रेंगाळणाºया युद्धामुळे फ्रान्स जेरीस आला होता. दिवसेंदिवस फासे त्याच्याविरुद्ध पडत चालले होते. फ्रान्सने व्हिएटमिन्हबरोबर परिणामकारक लढत देण्यासाठी हनॉई नदीच्या मुखावरील त्रिभूज प्रदेशात आपली ठाणी बळकट करण्याचे ठरवले. फ्रान्सचे प्रधानमंत्री रेनी मायर यांनी जनरल हेन्री नेवर यांची खास नेमणूक केली. व्हिएतनाममध्ये राजकीय तोडगा काढण्यास अनुकूल सैनिकी परिस्थिती निर्माण करण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि ते व्हिएतनाममध्ये दाखल झाले.

१९५१ मध्ये व्हिएतनाममधील ना सानच्या लढाईत ‘हेजहॉग पद्धत’ असे नामकरण केलेल्या डावपेचाने फ्रेंच सैन्याने व्हिएटमिन्हचा पराभव केला होता. (हेजहॉग हा एक प्राणी त्याला मराठीत साळू असे म्हणतात.) व्हिएटमिन्हच्या लाओसमधून येणाºया रसद मार्गावर मोठ्या संख्येत फ्रेंच सैन्याची संरक्षण फळी उभारून व्हिएटमिन्हची रसद तोडायची व त्यांना माघार घेण्यास भाग पाडायचे. ही या चालीमागची संकल्पना होती. हीच पद्धत उत्तरेतील ‘दिएन बिएन फू’ या लाओसजवळील क्षेत्रात वापरून व्हिएटमिन्हची कोंडी करावी, असा आदेश फ्रेंच सेनाप्रमुख रेनकॉनीय फ्रेंच सैन्याच्या स्थानिक प्रमुख अधिकाºयाला दिले.

‘हेज हॉग’ हा डावपेच नासानमध्ये यशस्वी ठरण्याचे प्रमुख काकरण म्हणजे त्या जागी फ्रेंचांचे मोर्चे उंचवट्यावर होते आणि बेचक्यामध्ये अडकलेल्या व्हिएटमिन्ह सैन्याला ते परिणामकारकपणे वेढू शकले होते. कोंडी झाल्यावर शरण जाण्याशिवाय व्हिएटमिन्हच्या तुकडीसमोर कोणताच पर्याय राहीला नव्हता. परंतु ‘दिएन बिएन फू’मध्ये परिस्थिती बरोबर उलटी होती. त्याचा आकार द्रोणासारखा होता. त्यात उलट आपणच अडकू असा व्हिएटमिन्हचा विचार होता. अल्प कालावधीत मोठ्या सैन्याची जमवाजमव करून आपली कोंडी करतीय याची फ्रेंच वरिष्ठ अधिकाºयांना कल्पना आली नाही. किंबहुना फ्रेंचांची या रणक्षेत्राची निवड जनरल गिआप यांच्या पथ्यावर पडली. ‘दिएन बिएन फू’ला त्यांनी एका भाताच्या वाडग्याची उपमा दिली. त्यात अडकलेल्या फ्रेंच सैन्याचा आपण खुतबा करू याची त्यांना खात्री होती.

फ्रेंच सैन्याचा फायदा : जनरल नेवर लवकरात लवकर कारवाई चालू करून आपले उद्दिष्ट साधण्यास उत्सुक होते. २० नोव्हेंबर १९५३ ला हालचाली सुरु झाल्या. पुढील तीन दिवसांत ९००० सैनिक विमानांनी ‘दिएन बिएन फू’च्या विमानपट्टीवर उतरले. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सहा फ्रेंच पॅराशूट बटालिअन पॅराशूटकरवी त्या क्षेत्रात उतरल्या. ‘दिएन बिएन फू’च्या सैनिकी तळाची जबाबदारी कर्नल ख्रिस्तीयन दे कॅस्ट्रीज या चिलखती दलाच्या अधिकाºयाकडे सोपवण्यात आली. दुर्देवाने रणगाड्याच्या युद्धात तरबेज असलेल्या कॅस्ट्रीजना जमिनीवरील पायदळ युद्धाचा अनुभव नव्हता. तो त्यांच्या अपयशास कारणीभूत ठरणार होता. दिएन बिएनचे खोरे सर्व बाजूनी घनदाट झाडी असलेल्या टेकड्यांनी वेढलेले होते. त्यात फ्रेंचानी सुमारे ११००० सैन्य तैनात केले. नंतर आलेली कुमक धरून ते १६ हजाराच्या घरात पोहोचले. त्यांच्याकडे दहा शेफी बनावटीचे रनगाडे, भरघोस तोफदळ आणि असंख्य विमाने होती. तेथील सैन्यात फ्रेंच सेना, फॉरीन लिजलायनर्सची विशेष प्रशिक्षित तुकडी, अल्जेरिया आणि मोरोक्को सैनिकांची पथके आणि स्थानिक व्हिएतनामीच्या तुकड्या होत्या. फ्रेंच सैन्याला विशेष कळू न देता व्हिएटमिन्हने जवळजवळ ५० हजार सैनिक दिएन बिएन फू भोवतालच्या टेकड्यांवर जमवले. त्यांच्यापाशी रशियन व चिनी बनावटीच्या तोफा होत. त्यांच्याकडे फ्रेंचांसारखा विमानाचा प्रचंड ताफा नसला तरी अचूक विमानभेदी अँटी एअरक्राफ्ट तोफा होत्या. विशेष म्हणजे फ्रेंचांना नकळत त्यांनी या तोफा अक्षरश: हातांनी ओढून टेकड्यांवर चढवल्या होत्या आणि डोंगरमाथ्यावर आरपार भगदाडे पाडून म्हणजे बोगदे करून त्या तोफांची तोंडे दिएन बिएन फूच्या खोºयांच्या बाजूला बाहेर काढली होती. व्हिएटमिन्हचा सैनिक , तोफखाना आणि विमानविरोधी तोफांची संख्या आपल्या चारपट आहे. हे फ्रेंच अधिकाºयांना ठाऊक नव्हे. १३ मार्च १९५४ रोजी अखेरीस लढाईला तोंड लागले आणि ती ७ मे पर्यंत चालू राहिली. व्हिएटमिन्ह सैन्याला कोंडीत पकडण्याचा डाव फ्रेंचावर उलटला. त्यांची पूर्ण मदार विमानाचे हल्ले आणि विमानांमार्फत मिळणाºया रसदीवर होती. परंतु व्हिएटमिन्हनी भोवतालीच्या टेकड्यांवरून केलेल्या विमानविरोधी तोफांच्या अचूक माºयाने आणि लढाई चालू झाल्यावर काही दिवसांतच विमानपट्टीच काबीज केल्यामुळे फ्रेंच वायूसेनेच्या मदतीला पारखे झाले. व्हिएटमिन्हनी पद्धतीरपणे एकामागून एक फ्रेंचांची ठाणी सर केली आणि ७ मे १९५४ ला फ्रेंचांना शरण जाण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. ८ मे ला जिनिव्हा येथे भरलेल्या परिषदेत व्हिएतनामची १७ व्या अक्षवृत्ताच्या रेषेत दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाममध्ये फाळणी झाली. हा पराभव जगभरातील फ्रेंच वसाहतवादाच्या कपाळमोक्षाची नांदी ठरली आणि अल्जेरिया, मोरक्को अशा एकामागून एक वसाहतीस त्यांना मुकावे लागले.

‘दिएन-बिएन फू’ ची साठमारी (उत्तरार्ध)

जमिनीची उत्तम पारख, तोफखान्याचा अपारंपारिक प्रयोग आणि विस्मय या युद्धतत्त्वाचा वापर या त्रिसूत्रीमुळे व्हिएटमिन्ह सेनापती जनरल गिआप यांनी बलिष्ठ पाश्चात्य फ्रेंच सेनेची ‘दिएन-बिएन फू’ मध्ये अक्षरक्ष: साठमारी केली. जगाच्या सेनाइतिहासात या लढाईला विशेष स्थान आहे.

‘दिएन-बिएन फू’ हे उत्तर व्हिएतनामधील एक रणक्षेत्र १३ मार्च व ८ मे १९५४ दरम्यान या ठिकाणी वसाहतवादी फे्रंच सैन्य आणि आधुनिक व्हिएतनामचे निर्माते हो चि मिन्ह यांनी त्यांच्या मायदेशावरील परकीय जू फेकून देण्यासाठी उभ्या केलेल्या व्हिएतनाम या स्वातंत्र्यसेनेमध्ये घमासान युद्ध झाले. त्यात फे्रंच सैन्याचा निर्णायक पराभव झाला आणि फ्रेंच वसाहतीवादी सत्तेला व्हिएतनाम कायमचे सोडून जावे लागले.

परस्परविरोधी सेना: आठ वर्षे विजय-पराजयाचा लपंडाव खेळल्यानंतर व्हिएटमिन्ह सैन्यावर निर्वाणीचा प्रहार करून त्यांना तडजोडीला राजी करण्यासाठी फ्रेंच सैन्याने जवळजवळ १६००० सैन्यबल रणक्षेत्रात उतरवले. त्याबरोबर त्यांच्याकडे आधुनिक तोफांचा मोठ्या प्रमाणात ताफा होता. फ्रेंच बनावटीच्या एम २४ शाफी रणगाड्यांची एक तुकडी (१० रणगाडे) त्यांनी आणली होती. त्याशिवाय विमाने आणि हेलिकॉप्टरचा अमर्याद पुरवठा होता. फ्रेंच सैन्याच्या शिबंदीत सेनेच्या तुकड्या, फॉरिन लिजनायरच्या विशेष प्रशिक्षित पलटणी, अल्जेरिया आणि मोरोक्कन सैन्याच्या तुकड्या आणि स्थानिक व्हिएतनामी सैन्याच्या विशेष करून दक्षिणेतील स्वामिनिष्ठ ‘ताय’ जमातीमधून भरती केलेल्या सैनिकांच्या तुकड्या होत्या. शिबंदीचे नेतृत्व कर्नल ख्रिस्तिअन कॅस्ट्रीज यांच्याकडे होते.

व्हिएटमिन्ह सेनेचा एका बंडखोर चमूपासून सशस्त्र सेनादलापर्यंत १९४५ ते ५४ या नऊ वर्षांतील प्रवास विशेष कौतुकास्पद होता. अर्थात त्यांना त्यासाठी रशिया आणि चीनचे सक्रिय साहाय्य लाभले होते. व्हिएटमिन्हचे मुख्य सेनाप्रमुख जनरल व्हो न्यूयेन गिआप यांनी या निकाली सामन्यासाठी उतरवलेल्या मोठ्या सेनाबलाची कल्पना शेवटपर्यंत फ्रेंच अधिकाºयांना नव्हती. गिआपनी व्हिएटमिन्हचे जवळजवळ ५०,000 सैनिक ‘दिएन-बिएन फू’ सभोवतालच्या टेकड्यांमध्ये जमा केले होते. त्याशिवाय त्यांचा तोफखाना आणि विमान विरोधी तोफांची संख्या फ्रेंच सैन्याच्या चौपट होती.

रणनिती: व्हिएटमिन्ह सेनांची रसद लाओसमार्गे त्यांच्याकडे पोचत असे. १९५१ मध्ये फ्रेंच सेनाप्रमुखाने नासान या रसदमार्गावरील जागी मोठ्या संख्येच्या सैन्यबलाकरवी व्हिएटमिन्हचा पराजय केला होता आणि त्यांची रसद गोठवून त्यांना माघार घेण्यास पार पाडले होते. हीच व्यूहनीती आणखीन वाढत्या प्रमाणात वापरून व्हिएटमिन्हला राजकीय तडजोडीसाठी भाग पाडायचे त्यांचे उद्दिष्ट होते. या डावपेचास त्यांनी नाव दिले होते-‘हेजहॉग टेक्निक’ हेजहॉग या एका कीटकभक्षक डुकरासारखे तोंड असलेल्या छोट्या प्राण्याच्या स्वरंक्षणासाठी निसर्गाने त्याला तीक्ष्ण बाणांचे आवरण दिले आहे. (मराठीत त्याला साळींदर असे नाव आहे.) त्याच्यावर संकट आल्यावर शत्रूने चाल केलीच तर आपली त्वचा प्रसारण करून तो शत्रूवर तीक्ष्ण बाण सोडतो. याच धर्तीवर व्हिएटमिन्हच्या रसद मार्गावर मोक्याच्या जागी सरंक्षण फळी उभारून शत्रूला आपला हल्ला करावयास भाग पाडायचे आणि ते लोभाला बळी पडल्यावर व्हिएटमिन्हचा निकाली विध्वंस करायचा, ही फ्रेंच सैन्याची योजना होती. ही निर्णायक संरक्षण फळी उभारण्यासाठी फ्रेंच जनरल नेंबर आणि कॉनी यांनी ‘दिएन-बिएन फू’ ची निवड केली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी कामचलाऊ विमानपट्टी होती आणि तिथे फ्रेंचांकडील अमाप विमानांच्या साहाय्याने सैनिक तुकड्या, शस्त्रात्रे, दारूगोळे आणि खाण्यापिण्याचे पदार्थ अत्यंत कमी वेळात उतरवून बलवत्तर मोर्चेफळी उभारणी आणि शत्रूला विस्मयचकित करणे शक्य होते. योजना भरभक्कम होती; परंतु एका गोष्टीचा मात्र फ्रेंचांना विसर पडला. ‘दिएन-बिएन फू’ विमानपट्टीच्या सभोवतालच्या प्रदेशाची रचना एखाद्या द्रोणाकारासारखी होती. विमानपट्टीच्या आजूबाजूला विस्तीर्ण क्षेत्र होते. परंतु त्याच्या भोवतालची खुज्या टेकड्यांची गोल रांग होती.  त्या टेकड्यांवर घनदाट झाडी होती. त्या टेकड्यांवर व्हिएटमिन्ह मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करतील आणि विशेष म्हणजे तोफा टेकडीच्या माथ्यापर्यंत आणतील, याची पुसटसुद्धा कल्पना फ्रेंच सेनाप्रमुखांच्या मनाला शिवली नाही.

व्हिएटमिन्हचे सेनाप्रमुख जनरल गिआप हे स्वत:च्या कर्तबगारीवर उच्चस्थानी पोचलेले अत्यंत चतुर आणि कल्पक सेनाधिकारी होते. फे्रंच सैन्याच्या योजनेचे मूल्यमापन केल्यावर फे्रंच वसाहतवादी सत्तेचा कपाळमोक्ष साधण्याची संधी आपणहून चालत आल्याची जाणीव त्यांना झाली आणि राजप्रमुख हो चि मिन्ह यांच्याशी चर्चा करून सर्व शक्ती पणाला लावण्याचा त्यांनी निर्धार केला. फे्रंच संरक्षणफळीवर हल्ला चढवण्यासाठी आपल्याला त्यांच्यापेक्षा तिप्पट वरचढ संख्या एकत्र केली पाहिजे, हे समजून त्यांनी व्हिएटमिन्हच्या पाच डिव्हीजनना (३०४, ३०८, ३१२, ३१६ आणि ३५१) उत्तर आणि पूर्वेकडील टेकड्यांमध्ये फ्रेंच सैन्याला चाहूल न लागता भोवतालच्या टेकड्यांवर गोळा होऊन हंगामी मोर्चे बांधण्याचे आदेश दिले. जनरल गिआप यांच्या डावपेचाचा हुकमी एक्का म्हणजे तोफांच्या वापराची पद्धती. सर्वसाधारणपणे तोफा रणक्षेत्रापासून दूर लावून तेथून आकाशमार्गे तोफगोळ्यांचा मारा करतात. याला अप्रत्यक्ष मारा (इनडायरेक्ट फायर) म्हणतात. परंतु जनरल गिआप यांनी त्यांच्या तोफखाना तुकडीप्रमुखाचा सल्ला मानून तोफा टेकडीच्या माथ्यापर्यंत चढविण्याचे आदेश दिले. परंतु त्या अगदी शिखरावर नेल्या नाहीत. त्याच्या जरा खाली त्या लावून आणि डोंगरमाथ्यात छोटे बोगदे (टनेल) करून त्यांच्या नळ्यांची तोंडे बोहेर काढण्यात आली. प्रत्येक तोफेने शत्रूच्या मोर्च्यावर सरळ तोफगोळ्यांचा मारा करायचा होता. तोफांच्या या वापराला ‘प्रत्यक्ष मारा’ (डायरेक्ट फायर) अशी संज्ञा आहे. विशेष म्हणजे या तोफांचा विमानातून किंवा शत्रूच्या तोफांकरवी वेध घेणे अशक्य होणार होते. हा गिआप यांचा सर्वश्रेष्ठ युद्धविजयी घटक ठरला. असेच समर्पक उदाहरण म्हणजे, कारगिल युद्धादरम्यान सुरूवातीस पर्वतउतारांवरील पाकिस्तानी मोर्चांवर ताबा करणे अशक्य होऊन बसले, तेव्हा ११-१२ जून १९९९ रोजी ५६ ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडिअर कौल आणि ८ माउंटन डिव्हीजनचे  तोफखानाप्रमुख ब्रिगेडिअर लखविंदर सिंग यांच्या चर्चेदरम्यान बोफोर्स तोफ पुढे आणून शत्रूच्या ‘बरबाद बंकर’ वर सरळ मारा करण्याची युक्ती सुचली आणि अंमलबजावणी होताच लढाईचा नूर पूर्ण पालटला.

फ्रेंच संरक्षण फळीची रचना: कर्नल ख्रिस्तिअन कॅस्ट्रीज यांनी आपल्या शिबंदीची (गॅरिसन) रचना आठ वेगवेगळ्या ठाण्यांत केली (नकाशा पहा) ‘दिएन-बिएन फू’ मध्ये इंग्रजी ‘वाय’ आकाराचे दोन रस्ते होते. हवाईपट्टी त्यांच्या तिठ्याजवळ होती. नामयुम नदी मध्यभागी वाहत होती. त्या सर्व ठाण्यांना स्त्रियांची नावे देण्यात आली होती. (सैनिकांचा समज होता की ही नावे कॅस्ट्रीज यांच्या मैत्रिणींची होती.) ब्रिअ‍ॅट्रिस, डॉमिनिक आणि एलिआन ही ठाणी उत्तर-दक्षिण दिशेत नामयुम नदीच्या पूर्वेला होती, तर गॅब्रिएल, अ‍ॅन-मारी, हॉक्रेट आणि क्लॉडिन ही पश्चिमेला होती. त्याच्या मधोमध ‘दिएन-बिएन फू’ची हवाईपट्टी होती. या सात ठाण्यांनी ती घेरल्यामुळे तिच्या सुरक्षिततेची हमी देण्यात आली होती. इझाबेल हे ठाणे मात्र दक्षिणेला काही अंतरावर होते. ते इतके वेगळे का ठेवले होते, हे कर्नल कॅस्ट्रीजच जाणे!

सेनांची जमवाजमव आणि लढाई: २० नोव्हेंबर १९५३ ला हालचाल सुरू झाली. ‘आॅप कॅस्टर’ नावाच्या कारवाईद्वारा फ्रेंचांनी तीन दिवसांतच नऊ हजार सैनिक विमानांनी आणि सहा पॅराशूट पलटणी पॅराशूटकरवी उतरवल्या. कर्नल कॅस्ट्रजनी सर्व सैनिकांना आपपल्या ठाण्यांत पोचण्याचे आणि मोर्चेबंदी पुरी करण्याचे आदेश सोडले. व्हिएटमिन्हची ३१५ ब्रिगेड लगोलग आपल्या ठिकाणात पोचली. त्यापुढील काळजीपूर्वक आणि कोणतीही घिसाडघाई न करता चालू ठेवली. शत्रूला आपल्या आगमनाची कमीतकमी माहिती मिळावी यावर त्यांचा जोर होता. या टेकड्यांची कोणतीही टेहळणी न करण्याची घोडचूक फ्रेंच सैन्याने केली. व्हिएटमिन्हना ‘दिएन-बिएन’ कडे लुभावण्यासाठी फे्रंचांनी उत्तरेकडील काही अंतरावरचे लाई चाऊ येथील ठाणे मोकळे करून तेथील शिबंदीला ‘दिएन-बिएन’कडे आगेकूच करण्याचे हुकूम सोडले. दुर्दैवाने ही बातमी गिआपनी लागली आणि ९ डिसेंबरला निघालेल्या २१०० सैनिकांपैकी केवळ १८५ सैनिक २२ डिसेंबरला ‘दिएन-बिएन फू’ला पोचले. सर्व जय्यत तयारी पूर्ण झाल्यावर १३ मार्च १९५४ ला रात्री व्हिएटमिन्हच्या ३१२ डिव्हीजनने बिअ‍ॅस्ट्रिवर हल्ला चढवला. त्याआधी आणि दरम्यान झालेला तोफमारा इतका भयानक होता, की गोळे कोठून येताहेत हेच फे्रंच सैन्याला कळेना. फ्रेंचाचे तोफखानाप्रमुख कर्नल चार्ल्स घिरोथ इतके चक्रावून गेले की त्यांनी आपल्या बंकरमध्ये जाऊन ग्रेनेडच्या स्फोटाने आत्महत्या केली. १४ मार्च ब्रिअ‍ॅस्ट्रिस पडले. १५ गॅब्रिअल हातात गेले. त्याबरोबरच हवाईपट्टीच्या उपयोगावर प्रबंध आला. त्यानंतर व्हिएटमिन्हने १७ मार्चला अ‍ॅन-मारीवर हल्ला केला. तिथे असलेल्या ‘ताय’ व्हिएतनामी सैनिकांनी पळ काढला. जनरल गिआपनी गेले दोन महिने केलेल्या प्रतिकाराचा तो परिणाम होता. १७ मार्च ते ३० मार्चदरम्यान व्हिएटमिन्हने लढाईत विश्राम घेतला. परंतु हवाईपट्टीचा उपयोग न करू शकल्याने फ्रेंचांना रसद व कुमकीचा मार्ग बंद झाला होता. ३० मार्च आणि ५ एप्रिल दरम्यान पुन्हा हल्ले झाले. ते नदीच्या पूर्वेकडील एलियाना आणि डॉमिनिकवर केंद्रित होते. बाकी सर्व मोर्चांपासून वेगळ्या आलेल्या इझाबेल ठाण्याची वासलात ३० मार्चच्या एका दिवसात लागली. त्यानंतर पहिल्या महायुद्धासारखे खंदक युद्ध (ट्रेंच वॉरफेअर) चालू राहिले. व्हिएटमिन्ह त्यात पारंगत होते. शेवटचा हल्ला ७ मेला झाला आणि फ्रेंचाचे शेवटचे ठाणे व्हिएटमिन्हने काबीज केले. फे्रंच सैन्य जिवाच्या कराराने लढले. त्यांनी कडवे प्रतिहल्ले चढवले. परंतु आपल्या श्रेष्ठ डावपेचाकरवी त्यांनी विजयश्री खेचून आणली होती. ८ मे १९५४ रोजी व्हिएटमिन्हने ११७२१ फे्रंच युद्धकैद्यांची मोजणी केली. २३०० फे्रंच सैनिक मारले गेले आणि ५२०० जखमी झाले होते. ‘दिएन-बिएन फू’ रणक्षेत्रावर २३००० व्हिएटमिन्हची आहुती पडली. जमीनीची उत्तम पारख, तोफखान्याचा अपारंपारिक प्रयोग आणि विस्मय या युद्धतत्त्वाचा वापर या त्रिसूत्रीमुळे व्हिएटमिन्ह सेनापती जनरल गिआप यांनी एका मदांध आणि बलिष्ठ पाश्चात्य फ्रेंच सेनेची ‘दिएन-बिएन फू’ मध्ये अक्षरक्ष: साठमारी केली. जगाच्या सेनाइतिहासात या लढाईला विशेष स्थान आहे.

संदर्भ:

१.      रॉय ज्यूल्स, ‘द बटल ऑफ दिएन बीएन फू’, न्यूयॉर्क, हार्पर अंड रो.

२.      डेविडसन, फिलिप, ‘विएतनाम अट वार, द हिस्टरी १९४६-७५’, ऑक्सफरड युनिव्हर्सिटी प्रेस.

Share
Leave a Comment